काकाणी विद्यालयातील शिक्षकांनी किल्ले मुल्हेर येथे दुर्गभ्रमंती करून केली शिवजयंती साजरी
मालेगाव (दि.२४ फेब्रु) - दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी झुं.प.काकाणी विद्यालयातील शिक्षकांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती किल्ले मुल्हेर येथे दुर्गभ्रमंती करून उत्साहात साजरी केली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. तुकाराम मांडवडे यांच्या संकल्पनेतून शिक्षकांनी प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही त्यांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या गडकिल्ल्यांना भेटी देऊन तेथे साजरी करावी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. याआधी शिवरायांच्या जयंतीनिमित्त किल्ले साल्हेर येथे देखील भेट देण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत झुं.प.काकाणी विद्यालयाच्या शिक्षकांनी किल्ले मुल्हेर व मोरगड येथे पायी रपेट करून किल्ल्यावर पोहचून शिवजयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला. सह्याद्रीच्या भव्यतेचा अनुभव प्रत्येकाच्या मनात शिवरायांच्या स्फूर्तीचा, अभिमानाचा, शौर्याचा, धगधगत्या इतिहासाचा, पराक्रमाचा, वारसा नवचैतन्य निर्माण करणारा होता. याप्रसंगी श्री.तुकारामजी मांडवडे यांनी शिवरायांवर विविध गाणी ,पोवाडे सगळ्यांकडून म्हणून घेतले. शिवरायांच्या जयजय काराने संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता. या नवचैतन्याचा प्रत्यक्ष अनुभव सर्व शिक्षकांनी घेतला. या उपक्रमात विद्यालयाचे प्राचार्य श्री. तुकाराम मांडवडे, विद्यालयाचे शिक्षक श्री. संदीप दुसाने, राकेश राजभोज, जयवंत जाधव, रतिलाल गवळी, गिरीश हिंगे, तर शिक्षकेतर कर्मचारी गितेश बाविस्कर व छायाचित्रकार श्री गणेश जंगम हे सहभागी झाले होते.