गुरू रविदास जयंतीनिमित्त व्याख्यान व सत्कार समारंभ संपन्न......
चर्मकार समाजातील सर्व पोटजातीने संघटित होऊन कार्य करावे- इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर....
मालेगांव : (दि. २३ फेब्रू) : गुरु रविदास महाराज यांच्या ६४५ व्या जयंतीनिमित्त 'गुरु रविदास समता सामाजिक विचारमंच मालेगाव' यांच्यातर्फे सामाजिक सप्ताहाचे आयोजन दि. २० फेब्रु २०२२ रोजी करण्यात आले होते. त्या निमित्ताने चर्मकार समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांचा सत्कार व गुरू रविदास महाराज या विषयावर व्याख्यानाचे आयोजन सुवर्णकार भवन मालेगांव येथे करण्यात आले होते. व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून अखिल भारतीय गुरु रविदास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, साहित्यिक, इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात गुरू रविदास महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. रविदास महाराज यांनी १४ व्या शतकात आपल्या दोह्यांच्या माध्यमातून समाजातील विषमता व जातीयता दूर करण्यासाठी प्रयत्न केले. देगलूरकर यांनी रविदास महाराज यांच्या अनेक दोह्यांचा अर्थ स्पष्ट करून सांगितला. व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी चर्मकार समाजातील विविध जातींना एकत्रित व संघटित होऊन कार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर किरण अहिरे, बबीताताई कासवे, बाळू पवार, किरण राजवंशी व सौ. अश्विनी अहिरे हे उपस्थित होते. यावेळी सटाणा शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर किरण अहिरे यांना 'गुरु रविदास समता मुलक जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बबीताताई कासवे, सतीष ठाकरे, रवींद्र फंगाळ, अजय तेली व किरण राजवंशी यांना 'गुरू रविदास समतामूलक पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी गुरू रविदास जयंती उत्सव समितीचे ही सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित तेली यांनी केले. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर महिला व समाज बांधव उपस्थित होते.
Tags:
मालेगांव