मा.ए.सोसायटीच्या विद्यालयांनी वाहीली भारतत्न लतादिदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मालेगाव (दि. ०७ फेब्रु) - आज दि. ६ फेब्रुवारी २०२२ सोमवार रोजी मा.ए.सोसायटी संचलित झुं.प. काकाणी विद्यालय, कै.रा.क.काकाणी कनिष्ठ महाविद्यालय, सौ. रू. झुं. काकाणी कन्या विद्यालय व नवीन प्राथमिक शाळा यांच्यावतीने भारतरत्न, गानसम्राज्ञी, गानकोकिळा स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या पवित्र स्मृतीचे स्मरण करून एकत्रितरित्या भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. विलासजी पुरोहित, सेक्रेटरी श्री. सतीषजी कलंत्री, कोषाध्यक्ष श्री. रामनिवासजी सोनी, संचालक श्री भोगीलालजी पटेल सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लतादीदींच्या "भेटी लागी जीवा लागलीसे आस" या अभंगाने करण्यात आली. प्रथमतः दीदींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शांती मंत्राचे पठण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत श्री.सतीषजी कलंत्री यांनी अशी गानसम्राज्ञी पुन्हा होणे नाही. लतादीदी एकच होत्या या शब्दात त्यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी विद्यालयाच्या शिक्षिका स्मिता पाटील यांनी लतादीदींचे "मेरी आवाज ही मेरी पेहचान" हे गीत म्हणून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक श्री. निलेश खैरनार, श्री. सुधीर पाटील, श्री. रविंद्र आहिरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेच्या तीनही विद्यालयांच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवीन प्राथमिक शाळेचे श्री. नरेंद्र गुरव सर यांनी केले. लतादीदींच्या आवाजात असलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Tags:
मालेगांव