अभिमानास्पद
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मालेगावचे कमलाकर देसले व राजेंद्र दिघे
मालेगाव (दि.27 नोव्हें) : नाशिक येथे ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून मालेगावच्या कवी कमलाकर देसले व राजेंद्र दिघे यांची निवड झाली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मुख्य कवी संमेलनात या दोघा कवींची निवड केल्याचे पत्र संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगनराव भुजबळ यांनी दिले आहे.
मराठी साहित्य परंपरेत सर्वात मोठे देशपातळीवरील साहित्य संमेलन भरवले जाते. या संमेलनात राज्यभरातील प्रत्येक विभागातून व देशातील मराठी भाषिक संस्था असलेल्या शहरातील साहित्यिकांना सादर होण्याची संधी मिळते.
आजपर्यंत मालेगाव परिसरातून अखिल भारतीय साहित्य संमेलनात पहिल्यांदाच दोघांची निवड झाली आहे.
नव्वदच्या दशकात सलग दहा वर्ष विविध गावात ग्रामीण साहित्य संमेलन समितीचे संमेलन भरली होती. साहित्य चळवळीत पंचवीस वर्षे योगदान दिले आहे. दोन्हीही कवी या चळवळीचे सक्रिय पदाधिकारी आहेत.
झोडगे येथील कमलाकर देसले यांचे ' ज्ञानिया तुझे पायी' व 'काही श्वास विश्वासाठी' दोन काव्यसंग्रह तर 'काळाचा जरासा घास' गझलसंग्रह प्रकाशित आहेत. अनेक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित आहेत.
शेंदुर्णी येथील राजेंद्र दिघे यांचा 'काळ्या आईची तहान' काव्यसंग्रह तर 'शाब्बास गुरूजी' हे पुस्तक मुख्यमंत्री यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित झाले. दिघे यांनाही अनेक साहित्य पुरस्कार मिळाले आहेत.
३ डिसेंबर रोजी मुख्य मंडपात रात्री आठला होणाऱ्या निमंत्रितांच्या कवी संमेलनात दोघेही कवी आपल्या रचना सादर करणार आहेत. कवी देसले व दिघे यांच्या निवडीचे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मालेगावकरांनी अभिनंदन केले आहे.