जगद्गुरू संत तुकाराम महाराज
मित्रहो आपण संत नामदेव, ज्ञानेश्वर माऊली, संत नाथ बाबा, संत रविदास,चोखामेळा व संत सेना संतांची मांदियाळीच. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण जन्म घेतला. संत तुकोबांना त्या सनातन काळातील विद्रोही कवी म्हणूया किंवा संत म्हणूया. ज्या काळात जातीव्यवस्था अतिशय प्रबळ होती, जातीव्यवस्था नाकारण्याचे धाडस कुणीही करत नव्हतं त्याकाळी ह्या तुकोबांनी त्या व्यवस्थेविरुद्ध विद्रोह केला. बंड केले आणि या साखळदंडातुन समाजाला मुक्त करण्याचे कार्य केले. अनेक संत त्या काळात या व्यवस्थेने पोळले गेले होते. संत चोखोबा पांडुरंगाला विनवून म्हणतात,"हीन याती माझी देवा कशी घडेल तुझी सेवा" थेट परमेश्वराशीच चोखोबांनी संवाद साधला कारण त्या काळात दीनदुबळ्यांचे कोणी वाली नव्हते. अशाच काळामध्ये आपल्या लेखणीने तुकोबांनी समाजतील विषमतेवर आसूड ओढला आपल्या अभंगांतून, किर्तन व प्रवचनातून समाजाचे प्रबोधन केले. तुकोबा सरळ सरळ म्हणतात वेदांचा अर्थ "आम्हाशीच ठावा, येरांनी वाहवा भार माथा" वेदांपेक्षा समाजाच्या वेदनाच तुकोबांना कळल्या. त्यामुळे त्यांनी विद्रोह केला.
"भेदाभेद भ्रम अमंगळ" असं ठासुन सांगितलं आणि सांगून थांबले नाहीत तर त्यांनी स्वतः कृती केली. त्यामुळे तुकोबा म्हणतात,"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले". विद्रोहाचे दुसरे नाव म्हणजे संत तुकोबा होय. साम्यवाद, समाजवाद जगाला कार्ल मार्क्सने शिकवला अस आम्हाला सांगितलं जातं पण ते साफ खोट आहे, जगाला आपल्या कृतीतून साम्यवाद आणि समाजवाद खऱ्या अर्थाने तुकोबांनी शिकविला. इंद्रायणीच्या डोहात आपल्या वाट्याची कर्जखते बुडवून कृतीयुक्त साम्यवाद जगाला शिकवला. दुर्दैवाने विद्रोही तुकाराम आज कोणी सांगत नाही. आज जो तो आपल्या ज्ञानाचा वापर न करता कौशल्याचा वापर करतो त्यामुळे खरे तुकाराम महाराज समाजापर्यंत पोहोचत नाहीत किंवा अद्याप पर्यंत पोहोचले नाहीत. माणूस जातीने नव्हे तर कर्माने संतपदाला पोहचतो हे संत रविदास संत, गोरोबा, संतसेना, संत नामदेव महाराजांनी दाखवून दिले. आज देखील तुकोबांचे नाव घेतले जाते नव्हे तर रोजची कीर्तने, प्रवचने तुकोबांच्या अभंगावर उभ्या महाराष्ट्रात रात्रंदिवस चालू आहेत पण भेदाभेद जात नाही. फाळण्या पाडणे चालूच आहे.
ज्यावेळी हा भेदाभेद संपूर्णपणे नाहीसा होईल त्याच वेळी तुकोबांचे साडेचार हजार अभंग सार्थकी ठरतील आणि तुकोबांच्या जन्माचे सार्थक होईल. आम्हाला तुकोबा कळलेच नाहीत त्यांना समाजाने अध्यात्माच्या चौकटीतच अडकवून ठेवले त्यांचा विद्रोह मांडलाच नाही. समाजाला एकच बाजू ठाऊक झाली पण समाजासाठी त्यांनी स्वताच्या संसारावर तुळशीपत्र ठेवले स्वतःच्या संसाराची राखरांगोळी केली. त्यांना त्या काळी प्रवाहाच्या विरोधात पोहताना झालेला त्रास,वेदना आम्हाला सांगितल्याच जात नाही. आम्ही संतांना व महापुरुषांना एका विशिष्ट चौकटीत ठेवून आपला स्वार्थ साधायला मोकळे होतो. हे समाजाचे दुर्दैवच होय.
"यारे यारे लहानथोर नरनारी" हे प्रमाण तुकोबांनी देऊन वारकरी संप्रदाय सगळ्यांसाठी खुला करण्याचे महान कार्य केले. त्या संप्रदायाचा बीज मंत्र 'राम कृष्ण हरी' हा देखील गुपित न ठेवता उघडा मंत्र दिला. यामागचे मूळ कारण आम्हाला अद्याप समजलेच नाही,त्यामुळे तुकोबा खऱ्या अर्थाने समाजाला समजले की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. ज्यावेळी भाव,विद्रोह समाजाला कळेल त्याचवेळी तुकोबांचे जीवन सार्थकी ठरेल. "जय जय राम कृष्ण हरी"
![]() |
शब्दांकन-प्रा.घनश्याम अहिरे (दाभाडी, मालेगांव) मो - 9850025575 |

