कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे सावित्रीबाई फुले व हॉकीपट्टू जयपाल सिंह मुंडा यांची जयंती साजरी.....
सावित्रीबाई फुले मुळेच भारतीय स्त्रीमध्ये क्रांतीकारक बदल – प्रभारी प्राचार्य प्रा. नारायण एल. सोनवणे
दिलीप पाथरे/ मालेगांव ग्रामीण प्रतिनिधी
रावळगाव (दि.०५ जाने): भारतीय समाजामध्ये पुरुषसत्ताक व्यवस्थेने हजारो वर्षांपासून स्त्रियांना चूल व मूल इथंपर्यंतच सीमित ठेवले होते. त्यामुळे त्या अज्ञान व अंधश्रद्धेमध्येच गुरफटून राहिल्या होत्या. यातून स्त्रियांना बाहेर काढण्याचे व त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे खुले करण्याचे महान कार्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केली. त्यासाठी त्यांना अत्यंत हाल अपेष्ठाना सामोरे जावे लागले. समाजातील कर्मठांच्या विरोधाला समोरे जावे लागते, अशा वेळी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतिबांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक उद्धाराचे आपले कार्य सुरूच ठेवले. त्यामुळे वर्तमान काळातील भारतीय स्त्रीमध्ये जो क्रांतीकारक बदल दिसून येत आहे, याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. असे श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ, डांगसौंदाणे संचलीत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथील कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून प्रभारी प्राचार्य प्रा. नारायण सोनवणे हे बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुरेशजी दादाजी वाघ हे होते.
यावेळी महाविद्यालयातील प्रा. सोनाली निकम बोलतांना म्हणाल्या की, सावित्रीबाईंनी ज्या काळी शिक्षण घेतले तो काळ महिलासाठी अतिशय बिकट होता. महिलांना समाजात मिळणारी वागणूक आणि त्यांची होणारी पिळवणूक यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही हे त्या जाणून होत्या. म्हणून त्यांनी पुण्यात बुधवार पेठेतील भिडे वाड्यात महात्मा फुले यांच्या बरोबर मुलींची पहिली शाळा सुरु केली. शाळा स्थापन करून सावित्रीबाई एवढ्यावरच न थांबता स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे असल्याचे ओळखून त्यांनी स्त्री शिक्षण आणि स्त्री मुक्ती क्षेत्रातही काम केले. त्यांचे हे काम त्यांच्या आजच्या लेकींनी असेच पुढे चालू ठेवले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. सोनाली निकम केले.
यावेळी जयपाल सिंग मुंडा यांच्या जीवन कार्याची माहिती देताना प्रा. अंबादास पाचंगे म्हणाले की, जयपाल सिंग यांचा जन्म ०३ जानेवारी १९०३ रोजी छोटा नागपूर आत्ताच्या झारखंड या राज्यामध्ये आदिवासी मुंडा या जातीमध्ये झाला. जयपाल सिंग मुंडा हे एक विख्यात राजनीतीतज्ञ, पत्रकार, लेखक, संपादक, शिक्षणतज्ञ व उकृष्ठ हॉकी पट्टू होते. जयपाल सिंग मुंडा हे भारतीय हॉकी संघाचे कर्णधार असताना त्यांच्याच नेतृत्वाखाली ऑलम्पिक मधील पहिले सुवर्णपदक भारतीय हॉकी संघास त्यांनी मिळवून दिले. संविधान सभेत आदिवासींच्या अनेक प्रश्नांना वाचा फिडण्याचे काम जयपाल सिंग मुंडा यांनी केले. अशा या महान अष्ठपैलू व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला आज भारतीय समाज विसरत चाललेला आहे. असे खेदाने नमूद करावे लागेल, प्रतिपादन प्रा. अंबादास पाचंगे यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सावित्रीबाई फुले यांच्या सारखा वेष परिधान करून उपस्थितांना त्यांच्या कार्याची माहिती दिली. महाविद्यालयातील देवरे प्रतीक्षा या विद्यार्थिनीने सावित्रीबाईंची हुबेहूब रांगोळी साकारून त्यांच्या प्रती आपली श्रद्धा व्यक्त केली, तर पूजा मोरे या विद्यार्थिनीने मी सावित्री बोलतेय हे एकपात्री नाटक सादर केले. तसेच विद्यार्थ्यांमधून कोमल थोरात, मोहिनी मार्तंड, स्वप्नील अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. अदिती काळे यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा.लक्ष्मी बोरसे यांनी केले, त्यात त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. पूनम गवळी यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील, प्रा. सौ. कल्पना पवार, प्रा. जी. एस. निकम, प्रा. जितेंद्र व्ही. मिसर, प्रा. शरद आंबेकर, प्रा. अंबादास पाचंगे. प्रा.भरत आहेर, प्रा. निलेश महाजन, प्रा. जयवंत के. अहिरे, प्रा. नितीन शेवाळे, प्रा. विजय पगार, प्रा. आकाश सूर्यवंशी, प्रा.सौ.जी.एस. खैरनार, प्रा.राकेश देवरे यांच्या सह कार्यालयीन अधिक्षक दिपक पवार, महाविद्यालयाचे ग्रंथपाल डी. व्ही. पाटील, महेंद्र पगारे, शालिवहान ठोके, राकेश शिरसाठ, मंगेश नंदाळे, डी.सी. पाटील, प्रवीण देवरे, मनोहर राजनोर, अमोल शिंदे, महेश बच्छाव, दुर्गेश थोरात, किरण बच्छाव, कमलेश अहिरे, गिरीश पवार, यांच्या सह महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.