सटाणा तालुक्यातील कोळीपाडा येथे वाघबारस सण साजरा - GRP NEWS महाराष्ट्र

 सटाणा तालुक्यातील कोळीपाडा येथे वाघबारस सण साजरा


सटाणा दि.३ नोव्हें २०२१: बागलाण तालुक्यातील कोळीपाडा या आदिवासी लोकवस्तीच्या गावात दिवाळीची सुरुवात वाघबारस या सणाने झाली. आदिवासी विचार मंच कोळीपाडा प्रतिनिधी विठ्ठल गातवे यांनी गावातील गुराखी बांधवांना सोबत घेऊन याचे नियोजन केले.आदिवासी बांधव आपल्या गुरांचे, शेळ्या,  मेंढ्या, म्हशी या पाळीव प्राणी तसेच आपल्या कुटुंबाचे वाघापासून संरक्षण व्हावे म्हणून गावाच्या सीमेवर जाऊन तिथे असलेल्या वाघ देवाची पूजा करतो व प्रार्थना करतो की,"हे वाघदेवा, आमचे व आमच्या प्राण्यांचे रक्षण कर" याप्रमाणे बिरसा ब्रिगेडचे शिलेदार निवृत्ती गातवे, केदा गातवे यांनी गावातून घरोघरी जाऊन तांदूळ, गूळ व वर्गणी गोळा करून त्यातून पूजा साहित्य  घेतले. सायंकाळी गावाच्या सीमेवर जाऊन तेथील वाघ देवाला शेंदूर लावून आजूबाजूची जागा शेणाने सारून रांगोळी व फुलांनी सजवण्यात आली.



राहुल भोईर, दिनेश भोईर व शुभम भोईर यांनी सामुदायिकपणे तिथे तांदूळ व गुळाची खीर बनवली. त्यावेळी केदा भांगे, वामन गातवे, गेनू गातवे, विशाल गातवे यांनी वाघ बनून भूमिका पार पाडली. प्रार्थना झाल्यावर सर्वांनी खिरीचा नैवेद्य वाघोबाला दाखवून सर्वांनी मिळून खिरीचा प्रसाद ग्रहण केला. आदिवासी भागात गुराख्यांची दिवाळी वाघबारस या सणाने सुरुवात होते तर काही गावात दिवाळीच्या पंधरा दिवसांत प्रथेप्रमाणे साजरी होते. काही गावात खिरीचा गोड नैवेद्य तर काही गावात कोंबडे, बकरे यांचा मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो. ही प्रथा नैवेद्य दाखवण्यापूर्ती न राहता कायम सुरू राहावी अशी अपेक्षा कोळीपाडा ग्रामस्थांच्या वतीने राजू गातवे,आप्पा गातवे यांनी व्यक्त केली.


[बातम्या व जाहिरातींसाठी आजच आमच्याशी संपर्क करा.7499712236]

[ प्रतिनिधी नेमणे आहे.]

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने