गुरु रविदासांचे दोहे - भाग १
![]() |
| गुरु रविदासांचे दोहे - भाग १ |
"रविदास जन्म के कारनै, होत न कोऊ नीच, नर कूं नीच करि डारि है,ओछे करम की किच"- गुरू रविदास.....
भारतातील मध्ययुगातील थोर व क्रांतिकारी संत गुरू रविदास महाराज यांनी आपल्या दोह्यांच्या माध्यमातून तत्कालीन समाजातील विषमता, जातीयता, उच्च-नीच, कर्मकांड व अंधश्रद्धेवर प्रहार केला आहे. मानवतावादी मूल्यांचा स्वीकार करत आपण सर्व एक आहोत ही शिकवण गुरु रविदासांनी आयुष्यभर दिली. संपूर्ण भारतभर पायी भ्रमण करत गुरू रविदास यांनी आपले क्रांतिकारी विचार समाजापर्यंत पोहोचविले. तत्कालीन वर्ण प्रथेला छेद देत गुरू रविदास आपल्या वरील दोह्यातून स्पष्टपणे सांगतात की जन्माने कोणीच नीच अथवा श्रेष्ठ ठरत नाही तर तो त्याच्या कर्माने म्हणजेच कार्याने श्रेष्ठ ठरत असतो.
"ब्राह्मणांच्या कुळातील जन्मलेले सर्व श्रेष्ठ व शूद्रांच्या कुळातील जन्मलेले सर्व नीच हा कोणता न्याय आहे?" असा प्रश्न ते आपल्या उपदेशातून तत्कालीन व प्रस्थापित समाजव्यवस्थेला विचारतात. आपण सर्व व एक आहोत कोणीच ब्रह्माच्या डोक्यातून अथवा पायातून जन्मलेला नसून निसर्ग नियमाप्रमाणे एका स्रीच्या उदरातून जन्मलेले आहोत असे ते ठणकावून सांगतात. म्हणून आपण आपले कार्य श्रेष्ठ केले पाहिजे सत्य,अहिंसा, नीती, प्रेम, बंधुता व सदाचार या मूल्यांचा अंगीकार करून आपण आपले जीवन श्रेष्ठ बनविले पाहिजे. हेच विचार गुरू रविदास यांनी या दोह्यातून स्पष्ट केले आहे.-
लेखक- रविंद्र सुरेश आहिरे
(संपादक-गुरू रविदास प्रबोधन)

