केपीजी महाविद्यालयातील हरित सेना व सामाजिक वनीकरण विभाग यांचा नायलॉन मांजाविषयक जनजागृतीसाठी संयुक्त आगळावेगळा प्रबोधन कार्यक्रम
इगतपुरी दि.10 – येथील केपीजी महाविद्यालयातील हरित सेना व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील घोटी टोलनाक्यावर नायलॉन मांजाविषयक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी विविध पक्ष्यांचे वेश धारण करून घोषवाक्यं, पोस्टर्स, माहितीपत्रकं यांच्या माध्यमातून महामार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांपर्यंत पक्षीसंवर्धनाचा संदेश पोहचवला. समग्र पक्ष्यांच्या वतीने चिमणीने संपूर्ण मानवजातीला उद्देशून लिहिलेले पत्र यावेळी सुमारे ४५० ते ५०० वाहनांपर्यंत पोहचवण्यात आले. या प्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल श्री. राजेंद्र आहेर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण रकिबे, घोटी टोलनाका व्यवस्थापक श्री. राजेंद्र पाटील, हरित सेना समन्वयक प्रा. नवनाथ बोंबले तसेच प्रा. डॉ. व्ही. बी. राठोड, प्रा. अंतापूरकर, डॉ. नितीन जाधव आदी उपस्थित होते.
विविध पक्ष्यांचा वेश धारण केलेल्या हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी घोषणा, मूकनाट्य, माहितीपत्रकं तसेच चिमणीने मनुष्याला उद्देशून लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रबोधनासाठी केलेल्या या धडक कार्यक्रमाचे सामाजिक वनीकरण विभाग तसेच सर्व स्तरांवरून कौतुक झाले. पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले केपीजी महाविद्यालय या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे पुन्हा एकदा अभिनंदनास पात्र ठरले आहे, अशी प्रतिक्रिया वनपाल श्री. राजेंद्र आहेर यांनी याप्रसंगी दिली. महाविद्यालयाचे कृतीशील प्राचार्य डॉ. किरण रकिबे यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘स्वत:ला पर्यावरणप्रेमी म्हणवून घेण्यापेक्षा पर्यावरणसेवक म्हणवण्यात आम्ही धन्यता मानतो. पर्यावरणसंवर्धनासाठी आमचे महाविद्यालय करीत असलेले काम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे, हे बघून आम्हाला आणखी जोमाने काम करण्याचे बळ मिळते. ही परंपरा अधिक नेटाने पुढे नेण्यासाठी आमचे महाविद्यालय निरंतर कृतीप्रवण राहील, याची मी ग्वाही देतो.’
हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेले चिमणीचे पत्ररूप आत्मकथन:
प्रिय माणसांनो,
नमस्कार! मी एक चिमणी बोलतेय. माझी समस्त पक्षीवर्गाच्या वतीने सर्व माणसांना कळकळीची विनंती आहे की, माझ्या माय-बाप ताई-दादांनो, तुमचा काही क्षणाचा पतंग उडवण्याचा आनंद हा आमच्यासाठी जीवघेणा ठरतोय. तो असा की, पंगत उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजाचा केला जाणारा वापर. त्यामुळे आकाशात फिरणारे माझे पक्षी मित्र मृत्युमुखी पडत आहेत. माझी मैत्रीण देखील एक चिमणी आहे. तिची चार पिल्लं अजून लहान होती. ती ज्या झाडावर रहायची त्या झाडावर पतंग व त्याबरोबर नायलॉनचा मांजा अडकलेला होता. तिच्या पिल्लांसाठी खायला आणण्यासाठी आकाशात झेप घेताना त्या मांज्यामुळे तिचे पंख कापले गेले व तिचा पाय देखील. यामुळे काही खायला नसल्याने माझ्या मैत्रिणीची पिल्ले घरट्यातच मरून पडली व ती देखील हताश होऊन मृत्युमुखी पडली. म्हणून एक पक्षी म्हणून सांगते की, कृपा करा, पण हा मांजा वापरणं थांबवा. तुमचा या मांज्यामुळे कुणाचंतरी आयुष्य थांबतंय. माझ्या ताईंनो, दादांनो, या मांज्यामुळे कुणाची तरी आई घरी परतत नाही तर कुणाची पिल्ले. कृपा करा व आम्हा पक्ष्यांकडून आमचे मायबाप, आमची पिल्लं हिरावून घेऊ नका ही कळकळीची विनंती! आपली, चिऊताई

